AUS vs PAK: बेंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरू असलेल्या ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान सामन्यांमध्ये सलामीचा फलंदाज डेव्हिड वॉर्नर याने धडाकेबाज शतकी खेळी करत नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूंच्या यादीत त्याने एडम गिलख्रिस्टला पाठीमागे टाकले आहे. ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये वॉर्नर आता दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.
वॉर्नरने या सामन्यात एक शतक करत अनेक विक्रम केले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमधील त्याचे हे 21 वे शतक आहे. तसेच विश्वचषक स्पर्धेत त्याने ठोकलेले हे पाचवे शतक ठरले. यासह त्याने ऑस्ट्रेलियाचाच दिग्गज रिकी पॉंटिंग आणि कुमार संघकारा याच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. या दोघांनी देखील विश्वचषक स्पर्धेत प्रत्येकी पाच शतके ठोकली आहेत.
AUS vs PAK: डेव्हिड वॉर्नरने ठोकले शानदार शतक .
पाकिस्तानने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात वॉर्नरने पाकिस्तानच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. त्याने अवघ्या 85 चेंडूत शतक साजरे केले. वॉर्नरने पाकिस्तान विरुद्ध खेळताना सलग चार शतके ठोकण्याचा विक्रम देखील केला आहे. यासह त्याने विराट कोहलीच्या एकाच देशाविरुद्ध सलग चार सामन्यात शतके ठोकण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली. विराट कोहलीने वेस्टइंडीज विरुद्ध खेळताना सलग चार सामन्यात शतके ठोकली आहेत.
डाव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या वॉर्नरने 124 चेंडूत 163 धावांची विक्रमी खेळी केली. यात 14 चौकार आणि 9 उत्तुंग षटकारांचा समावेश आहे. त्याच्या धडाकेबाज खेळीपुढे पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजाकडे कोणतेच उत्तर नव्हते. सर्वच गोलंदाज निष्प्रभ ठरले.
विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया कडून खेळताना सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम रिकी पॉंटिंग च्या नावावर आहे. पॉंटिंगने 1743 धावा केल्या आहेत. सर्वाधिक धावा काढणारे खेळाडूंची यादीत तो पहिल्या स्थानावर आहे. एडम गिलक्रिस्ट याने 1085 धावा केल्या आहेत. तो या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. मार्क वॅ! च्या नावावर विश्वचषक स्पर्धेत 1004 धावा केल्याची नोंद आहे. तर मॅथ्यू हेडन यांच्या नावावर 987 धावांची नोंद आहे. 36 वर्ष डेव्हिड वॉर्नरचे कदाचित हे शेवटचे विश्वचषक असू शकेल. पॉंटिंगचे विक्रम मोडण्यासाठी त्याला प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागेल.
प्रत्येक विश्वचषक स्पर्धेत चॅम्पियन संघासारखा खेळणारा ऑस्ट्रेलियाचा संघ यंदा मात्र फारशी छाप सोडण्यात यशस्वी ठरला नाही. याच ऑस्ट्रेलिया संघाने पाच वेळा विश्वचषक आपल्या नावावर केला आहे. यंदा मात्र या संघाला सेमी फायनल मध्ये पोहोचण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे.
आधिक वाचा-
–भारत पाकिस्तान सामन्यानंतर वाईट बातमी समोर.. संपूर्ण विश्वचषक स्पर्धेतून बाहेर झाला कर्णधार.