आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधीनी या 2 महारान्यांना तुरुंगात टाकल होते,एकीचे तर केले होते असे हाल..

आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधीनी या 2 महारान्यांना तुरुंगात टाकल होते,एकीचे तर केले होते असे हाल..


भारतात आणीबाणी (Emergency  )जाहीर झाल्यावर इंदिरा गांधींच्या निशाण्यावर दोन महाराण्या आल्या होत्या. एक होत्या जयपूर आणि दुसऱ्या ग्वाल्हेरच्या. या दोघीही संसदेतील विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांपैकी एक तर होत्याच, पण त्यांची लोकप्रियताही शिगेला पोहोचली होती.

या दोघींचीही राजकीय विश्वासार्हता कमी व्हावी यासाठी त्यांना अटक करण्यात आली. पण राजकीय विरोधक म्हणून नव्हे तर आर्थिक गुन्हेगार म्हणून ही अटक झाली होती.

राजमाता गायत्री देवींना त्रास देणं तर आणीबाणी जाहीर होण्यापूर्वीच सुरू झालं होतं. तर जयपूर राजघराण्याच्या प्रत्येक घरावर, राजवाड्यावर आणि कार्यालयावर आयकर छापे पडू लागले होते.

आणीबाणी जाहीर झाली तेव्हा गायत्री देवी 56 वर्षांच्या होत्या आणि त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू होते.

30 जुलै 1975 च्या रात्री त्या आपल्या दिल्लीतल्या घरी पोहोचल्या. तेव्हा पोलिसांनी त्यांना परकीय चलन आणि तस्करी विरोधी कायद्यांतर्गत अटक केली.

पोलिसांनी त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा कर्नल भवानी सिंग यांनाही ताब्यात घेतलं. परदेश प्रवासातून जे डॉलर शिल्लक राहिले होते ते सरकार दरबारी जमा केला नसल्याचा आरोप भवानी सिंह यांच्यावर लावण्यात आला. दोघांची रवानगी दिल्लीतील तिहार तुरुंगात करण्यात आली.

तिहारचं दुर्गंधीयुक्त तुरुंग जिथं पंख्याचीही सोय नव्हती या तुरुंगात रवानगी करण्यापूर्वी त्यांना स्थानिक पोलिस ठाण्यात नेण्यात आलं.

‘अ प्रिन्सेस रिमेम्बर्स’ या आपल्या आत्मचरित्रात गायत्रीदेवी लिहितात, “पोलिस स्टेशनमधील प्रत्येकाने भवानी सिंह यांना ओळखलं होतं. ते राष्ट्रपतींचे अंगरक्षक होते आणि 1971 च्या युद्धात त्यांनी गाजवलेल्या शौर्याबद्दल त्यांना महावीर चक्र मिळालं होतं.”

इंदिरा गांधी

“टुरिस्ट सिजनमध्ये ज्याप्रकारे हॉटेल्स तुडुंब भरतात अगदी त्याप्रमाणेच दिल्लीतली सर्व तुरुंग भरलेले होते. तिहार तुरुंगाच्या अधीक्षकांनी पोलिस अधिकाऱ्याला आमच्या राहण्याची व्यवस्था करण्यासाठी काही वेळ मागून घेतला.”

“तीन तासांनंतर जेव्हा आम्ही तिहारला पोहोचलो तेव्हा त्यांनी आमच्यासाठी चहा मागवला आणि आमच्या घरी फोन करून आमच्यासाठी अंथरुणाची सोय केली,” गायत्रीदेवी सांगतात.

जॉन झुब्रझिकी लिखित ‘द हाऊस ऑफ जयपूर’ या राजमाता यांच्या चरित्रातील उल्लेखानुसार, “भवानी सिंह यांना तुरुंगातील बाथरूमच्या खोलीत ठेवण्यात आलं तर गायत्री देवी यांना दुर्गंधीयुक्त खोली देण्यात आली होती जिथं नळ तर होता मात्र त्याला पाणी येत नव्हतं. महाराणींच्या खोलीत कम्युनिस्ट कार्यकर्त्या श्रीलता स्वामीनाथन यांनाही ठेवण्यात आलं होतं.”

त्या दोघींच्या खोलीत फक्त एकच पलंग होता. श्रीलता यांनी तो पलंग महाराणींना देऊ केला आणि त्या स्वतः जमिनीवर झोपू लागल्या. महाराणींच्या प्रभावामुळे त्यांना दररोज सेन्सॉर केलेलं वृत्तपत्र आणि सकाळचा चहा दिला जायचा. संध्याकाळी त्यांना त्यांचा मुलगा भवानी सिंहसोबत फिरण्याची परवानगी देण्यात आली.

कैदी लैला बेगमला महाराणींच्या सेवेत ठेवण्यात आलं होतं. ती रोज त्यांची खोली साफ करायची.

15 नोव्हेंबर 1977 रोजी टाइम्स ऑफ इंडियामध्ये ‘राजमाता नरेट्स टेल्स ऑफ वेंडेटा’ ही गायत्री देवी यांची मुलाखत प्रसिद्ध झाली. या मुलाखतीत त्या म्हणाल्या होत्या, “पहिल्या रात्री मला झोप येत नव्हती. माझ्या कोठडीच्या बाहेर एक नाला होता ज्यामध्ये कैदी शौचाला जायचे. खोलीत कोणीच नव्हतं. पंखा नव्हता आणि डास आमच्या रक्ताच्या प्रेमात पडले होते.”

 

“कोठडीतलं वातावरण एका मासळी बाजारासारख होतं. तिथं चोर आणि सेक्स वर्कर्स एकमेकांवर खेकसत होते. आम्हाला सी क्लास ही श्रेणी देण्यात आली होती.”

वाचनामुळे डोळ्यांवर ताण
तिहारच्या वास्तव्यादरम्यान, महाराणी गायत्री देवींचा मुलगा जगत त्यांना इंग्लंडमधून व्होग आणि टॅटलर मासिकाचे नवे अंक पाठवायचा.

महाराणींना आठवड्यातून दोनदा भेटायला येणाऱ्या लोकांमुळेच त्यांना तुरुंगात ट्रान्झिस्टर रेडिओ मिळू शकला. या ट्रान्झिस्टरवरून महाराणी बातम्या ऐकायच्या.

‘द इमर्जन्सी अ पर्सनल हिस्ट्री’ या पुस्तकाच्या लेखिका कुमी कपूर पत्रकार वीरेंद्र कपूर यांना सांगतात, “गायत्रीदेवी तुरुंगातील इतर महिलांपासून अंतर राखून असायच्या. त्या कधीतरी त्यांच्याकडे पाहून हसायच्या, कधी त्यांच्याशी बोलायच्या. पण कधीच त्यांच्यामध्ये मिसळायच्या नाहीत.”

विजयाराजे सिंधिया यांनाही तिहारमध्ये डांबण्यात आलं होतं.

जवळपास एक महिना उलटल्यानंतर, ग्वाल्हेरच्या राजमाता विजयाराजे सिंधिया यांनाही इथं आणलं जातंय आणि त्यांनाही गायत्रीदेवींच्या खोलीत ठेवण्यात येईल असं तिहार तुरुंगातील अधिकाऱ्यांकरवी सांगण्यात आलं.

त्यांच्या खोलीत दुसरा पलंग ठेवला तर तिथं उभं राहायलाही जागा उरणार नाही, असं म्हणत राजमातांनी त्याला विरोध केला.

गायत्री देवी त्यांच्या ‘द प्रिन्सेस रिमेम्बर्स’ या आत्मचरित्रात लिहितात, “मला योगा करण्यासाठी माझ्या खोलीत थोडी जागा हवी होती. आणि मला रात्रीच्या वेळी वाचण्याची आणि गाणी ऐकण्याचीही सवय होती. आमच्या दोघींच्याही सवयी वेगळ्या होत्या. त्या पूजा अर्चेत आपला सर्व वेळ खर्ची घालायच्या.”

“तुरुंग अधीक्षकांनी माझी विनंती मान्य केली आणि राजमातांसाठी आणखी एका खोलीची व्यवस्था करण्यात आली. मात्र सप्टेंबरमध्ये दमट वातावरण असल्याने, मी तुझ्या खोलीला लागून असलेल्या व्हरांड्यात झोपू शकते का? असा प्रश्न राजमातांनी विचारल्यावर माझ्या खोलीला लागून असलेल्या व्हरांड्यात मी पडदा लावून त्यांच्या झोपण्याची व्यवस्था केली.”

3 सप्टेंबर 1975 रोजी ग्वाल्हेरच्या राजमाता विजयराजे सिंधिया यांना तिहार तुरुंगात आणण्यात आलं होतं.

 

त्यांच्यावरही आर्थिक गुन्ह्यांची कलम लावण्यात आली होती. त्यांची सर्व बँक खाती गोठवण्यात आली. त्यांच्यावर एक वेळ तर अशी आली की, आपला खर्च भागवण्यासाठी त्यांना आपली मालमत्ता विकावी लागली, तर कधी मित्रपरिवाराकडून कर्ज घेऊन आपला खर्च भागवावा लागला. मित्रपरिवाराकडून कर्ज घेणं तितकं सोपं नसायचं. कारण जो कोणी आणीबाणीतील अपराध्याला मदत करायचा त्याच्यावर सरकारची खप्पामर्जी व्हायची.

राजमाता आणि महाराणींची भेट
सिंधिया त्यांच्या ‘प्रिन्सेस’ या आत्मचरित्रात लिहितात, “मी तिहारमध्ये कैदी क्रमांक 2265 होते. मी तिहारला पोहोचले तेव्हा जयपूरच्या महाराणी गायत्री देवी यांनी तिथं माझं स्वागत केलं. आम्ही दोघांनीही डोके झुकवून आणि हात जोडून एकमेकींना अभिवादन केलं.”

 

त्यांनी काळजीच्या स्वरात मला विचारलं “तुम्ही इथं कशा? ही खूप वाईट जागा आहे. माझ्या खोलीला लागून असलेल्या बाथरूममध्ये एकही नळ नव्हता. टॉयलेटच्या नावावर फक्त खड्डा बनला होता. कारागृहातला सफाई कर्मचारी दिवसातून दोनदा तिथं पाण्याच्या बादल्या घेऊन यायचा आणि त्या खड्ड्यात पाणी टाकून स्वच्छ करण्याचा प्रयत्न करायचा.”

तुरुंगातले मच्छर आणि डास
विजयराजे सिंधिया पुढे लिहितात, “गायत्री देवी आणि मी कदाचित पूर्वीश्रमीच्या महाराण्या असू, मात्र तिहार जेलची महाराणी एक कैदी होती. तिच्याविरुद्ध 27 खटले प्रलंबित होते, त्यापैकी चार खून खटले होते. ती तिच्या ब्लाउजमध्ये ब्लेड ठेवायची. तिच्या आडवं कोण आलं तर ब्लेडने चेहरा खराब करण्याची धमकी द्यायची. तिच्याकडे घाणेरड्या शिव्यांचे भांडार होतं जे ती न घाबरता वापरायची.”

गायत्रीदेवींना तिथं येऊन दोन महिने उलटले होते. त्यामुळे त्यांना दर आठवड्याला लोक भेटायला येऊ शकत होते. या लोकांच्या माध्यमातून गायत्री देवींना तुरुंगात बॅडमिंटन रॅकेट, एक फुटबॉल, दोन क्रिकेट बॅट आणि काही चेंडू मिळू शकले. यानंतर त्यांनी तुरुंगातल्या मुलांना खेळ शिकवायला सुरुवात केली. पण तुरुंगात राहण्याची सोय खूपच वाईट होती.

विजयराजे लिहितात की, “खोलीत सदासर्वकाळ दुर्गंधी यायची. जेवताना आम्ही एका हाताने गुरगुरणाऱ्या माशा दूर करायचो. रात्री माश्या गेल्या की त्यांची जागा डास आणि इतर कीटक घ्यायचे.”

“पहिल्या महिन्यात मला कोणत्याही व्यक्तीला भेटू दिलं नाही. मला कुठल्या तुरुंगात ठेवलंय हे सुद्धा माझ्या मुलींना माहीत नव्हतं. रात्रीच्या वेळी माझ्या खोलीतला बल्ब सुरू असायचा ज्याची सावली सुद्धा पडायची नाही.”

The last day of Indira Gandhi - India News

गायत्रीदेवींची प्रकृती खालावली
याचदरम्यान, गायत्रीदेवींचे वजन दहा किलोंनी कमी झालं आणि त्यांना लो ब्लड प्रेशरचा त्रास होऊ लागला.

कुमी कपूर त्यांच्या ‘द इमर्जन्सी अ पर्सनल हिस्ट्री’ या पुस्तकात लिहितात, “गायत्री देवींच्या तोंडात फोड आले होते. तुरुंग प्रशासनाने गायत्रीदेवींना त्यांच्या वैयक्तिक दंतचिकित्सकाला ही भेटू दिलं नाही. बरेच आठवडे उलटून गेल्यानंतर त्यांना दिल्लीच्या कर्झन रोडवरील प्रसिद्ध डॉक्टर बेरी यांच्या क्लिनिकमध्ये ऑपरेशन करण्याची परवानगी मिळाली.”

 

त्यानंतर तुरुंगातील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, त्यांना दिल्लीतील जीबी पंत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे गायत्रीदेवींच्या पित्ताशयातही खडे झाल्याचं आढळून आलं. मात्र आपल्या कुटुंबीयांशिवाय आपण ऑपरेशन करणार नाही असं म्हणत त्यांनी नकार दिला.

गायत्रीदेवी त्यांच्या आत्मचरित्रात लिहितात की, “पंत हॉस्पिटलमध्ये घालवलेली ती पहिली रात्र खूप भीतीदायक होती. माझ्या खोलीत मोठमोठे उंदीर फिरत होते. माझ्या खोलीबाहेर तैनात असलेले संत्री त्यांना हाकलून देण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या बुटांच्या आवाजामुळे रुग्णालयातील इतर रुग्णांना झोप येत नव्हती. दुसऱ्या दिवशी डॉ. पद्मावतींनी मला बाथरूम असलेल्या स्वच्छ खोलीत हलवलं.”

“ऑगस्ट 1975 मध्ये गायत्री देवी आणि त्यांचा मुलगा भवानी सिंह यांनी आरोग्याच्या कारणास्तव तुरुंगातून सुटका व्हावी अशी विनंती सरकारला केली. तत्कालीन अर्थ राज्यमंत्री प्रणव मुखर्जींनी ते पत्र इंदिरा गांधींकडे पाठवून त्यांची सुटका करण्याची शिफारस केली होती. पण पंतप्रधानांनी गायत्री देवी आणि भवानी सिंह यांची विनंती मान्य केली नाही.

दुसरीकडे, लंडनमधील लॉर्ड माउंटबॅटन यांनी गायत्रीदेवींच्या सुटकेसाठी इंदिरा गांधींना पत्र पाठवावं असा आग्रह ब्रिटनच्या महाराणींकडे धरण्यास सुरुवात केली.

जॉन झुब्रझिकी गायत्री देवी यांच्या चरित्रात लिहितात, “दिल्लीतील ब्रिटीश उच्चायुक्तांचं असं मत होतं की ब्रिटिश राजघराण्याने या प्रकरणात हस्तक्षेप करू नये, कारण त्यांच्या दृष्टीने ही भारताची अंतर्गत बाब आहे. आणि असं जरी झालं तरी इंदिरा गांधी ही गोष्ट ऐकतील याचीही खात्री नव्हती.

गायत्रीदेवींनी इंदिराजींना पत्र लिहिलं
अखेरीस गायत्रीदेवींच्या संयमाचा बांध सुटला आणि त्यांनी थेट इंदिरा गांधींना त्यांच्या सुटकेसंदर्भात पत्र लिहिलं.

त्या पत्रात लिहितात, “आंतरराष्ट्रीय महिला वर्षाच्या समाप्तीच्या निमित्ताने, मी आपल्या देशाच्या भल्यासाठी तुम्हाला आणि तुमच्या कार्यक्रमांना पाठिंबा देण्याचं आश्वासन देते.”

स्वतंत्र पक्ष असाही संपला असल्याने मी राजकारणातून संन्यास घेत आहे. तसेच मी इतर कोणत्याही पक्षाची सदस्य होण्याचा विचार करत नसल्यामुळे मला सोडण्यात यावं. माझ्या सुटकेसाठी तुमच्या आणखी काही अट असतील तर त्याही मी मान्य करायला तयार आहे.

जॉन झुब्रझिकी लिहितात, “सरकारची पहिली अट होती की गायत्री देवी आणि त्यांच्या मुलांनी त्यांच्या अटकेला आव्हान देणार्‍या याचिका मागे घ्याव्यात. गायत्रीदेवींनी ही अट तात्काळ मान्य केली.

सरतेशेवटी त्यांच्या सुटकेच्या आदेशावर 11 जानेवारी 1976 रोजी सह्या झाल्या. सुटकेच्या दिवशी त्यांची बहीण मनेका त्यांना रुग्णालयातून तिहार तुरुंगात घेऊन गेली. तिथं असलेलं सामान त्यांनी घेतलं. या तुरुंगात त्यांनी एकूण 156 रात्री काढल्या होत्या.

“तिथे राहणारे कैदी आणि ग्वाल्हेरच्या राजमाता यांचा निरोप घेतला. त्या दिल्लीतील औरंगजेब रोडवरील त्यांच्या निवासस्थानी परतल्या. सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यावर निर्बंध असतानाही त्या दोन दिवसांनंतर, कारने जयपूरला गेल्या. त्यांच्या स्वागतासाठी सुमारे 600 लोक उभे होते. त्यानंतर त्या बॉम्बेला गेल्या जिथे त्यांच्या पित्ताशयातीलखड्यांवर शस्त्रक्रिया झाली.”

तिहारमध्ये भजन आणि ‘कॅबरे’
दुसरीकडे, विजयराजे सिंधिया यांची कन्या उषा यांना खूप मेहनतीनंतर इंदिरा गांधींची भेट मिळवण्यात यश मिळालं.

जेव्हा त्यांनी आपल्या आईला सोडावं अशी विनंती केली तेव्हा इंदिरा गांधी म्हणाल्या की, ‘त्यांना राजकीय कारणांसाठी नाही तर आर्थिक गुन्ह्यांसाठी अटक करण्यात आली आहे.’

तुरुंगातील परिस्थिती अत्यंत वाईट होती. पण तुरुंगात त्यांच्या मनोरंजनाचीही व्यवस्था होती.

इंदिरा गांधी

विजयराजे सिंधिया लिहितात, “एके दिवशी महिला कैद्यांच्या एका गटाने माझ्या मनोरंजनासाठी गाण्याबजावण्याचा कार्यक्रम केला. त्यात या सगळ्याजणी चित्रपटातील गाणी सुरात म्हणायच्या आणि त्याला ‘कॅबरे’ म्हणायच्या. त्याऐवजी मला भजन गायला आवडायचं. मग माझ्या सांगण्यावरून त्यांनी भजने गायला सुरुवात केली. पण ‘कॅबरे’ ऐवजी कोणाला भजन का आवडेल? असा प्रश्न त्यांना पडला. पण आधी भजन आणि नंतर कॅबरेला त्या तयार झाल्या.

तुरुंगातून सुटका
काही दिवसांनी विजयराजे सिंधिया आजारी पडल्या. त्यांना उपचारासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

 

सिंधिया लिहितात, “मला एका खाजगी खोलीत ठेवण्यात आलं होतं. माझ्या खोलीबाहेर एक संत्री बसवण्यात आला होता. कोणालाही मला भेटण्याची परवानगी नव्हती. एके दिवशी एक पाहुणा जबरदस्तीने माझ्या खोलीत घुसला.”

“तो पाहुणा म्हणजे काश्मीरचे मुख्यमंत्री शेख अब्दुल्ला होते. ते स्वत: एम्समध्ये उपचार घेत होते. हा एक विचित्र योगायोग होता. मला आठवतं की 12 वर्षांपूर्वी जेव्हा ते कैदी होते तेव्हा मी त्यांना भेटायला गेली होती. एका सकाळी मला सांगण्यात आलं की माझ्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे मला पॅरोलवर सोडण्यात येत आहे.”

 

सिंधिया बाहेर निघाल्या तेव्हा तिथल्या महिला कैद्यांनी तुरुंगाच्या आतील गेटच्या दोन्ही बाजूला उभं राहून त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला. विजयराजे सिंधिया तुरुंगातून बाहेर आल्या तेव्हा त्यांच्या तीन मुली त्यांची वाट पाहत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर हसू तर होत पण त्याचवेळी त्यांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले होते.


 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top