तुटलेली ढाल, तुटलेला हात.. तरीही किल्ला ताब्यात येईपर्यंत लढत राहिला हा शिवरायांचा मावळा..

By | November 15, 2022
मावळा

तान्हाजी मालुसरे म्हणजे शिवाजी महाराज यांच्या बालपणाचे सवंगडी स्वराज्य स्थापनेच्या प्रारंभीपासून समाविष्ट असलेले शूर, पराक्रमी आणि एकनिष्ठ विश्वासू असे सुभेदार.

 

महाराज म्हणजे आपले जीव की प्राण समजून स्वराज्यासाठी तळहातावर आपले शीर घेऊन लढणारे भूमिपुत्र तान्हाजी मालुसरे.

तान्हाजी मालुसरे यांचे जन्मगाव सातारा जिल्ह्यातील गोडवली तर कर्मभूमी हे महाड तालुक्यातील उमरठ हे आहे. स्वराज्य स्थापनेच्या सुरवातीपासून तान्हाजी मालुसरे यांनी अनेक मोहिमांमध्ये सहभाग घेत आपला पराक्रम गाजवला होता याच्या ऐतिहासिक नोंदी उपलब्ध आहेत.

अफजलखानाच्या वधानंतर झालेल्या धुमचक्रीत तानाजी मालुसरे जातीने हजर होते (१६५९ ), दाभोळ मोहीम (१६६०), उंबरखिंडीतील कारतलबखानाचा पराभव (१६६१ ). विशेषता सूर्यराव सुर्वे यांचा पाडाव (१६६२ ) तसेच शाहिस्तेखान याच्यावरील हल्ला (१६६३) या घटनात तान्हाजी मालुसरे यांनी आपल्या पराक्रमाची शर्थ केलेली दिसते.

या सगळ्या मोहिमांमध्ये आपले शौर्य दाखवणारे सुभेदार तान्हाजी मालुसरे इतिहासात कायमचे अजरामर झाले ते एका ऐतिहासिक मोहिमेत आपला पराक्रम गाजवतना धारातीर्थी पडले ती मोहीम म्हणजे कोंढाणा अर्थात सिंहगड विजय मोहीम..

 

तान्हाजी मालुसरे

किल्ला कोंढाणा म्हणजे भोसले घराण्याचा ऋणानुबंध असलेला किल्ला, स्वराज्यसंकल्पक शहाजीराजे हे या किल्ल्यावरून काही काळ कारभार देखील पाहत होते, हाच कोंढाणा शहाजीराजे यांच्या कैदेतुन सुटकेच्यासाठी आदिलशाहला द्यावा लागला होता.

तर नंतर मराठ्यांनी जिंकलेला हा किल्ला १६६५ साली पुरंदरच्या तहात इतर २३ किल्ल्यांसमवेत मोगलांच्या स्वाधिन करावा लागला होता. १६७० साली छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांच्या विरोधात आघाडी उघडली, मराठा सैन्य बागलाण तसेच वऱ्हाड भागात पसरले होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी पुरंदरच्या तहात मोगलांना दिलेले किल्ले जिंकण्याचा विचार केला तेंव्हा भौगोलिक तसेच इतर अनेक दृष्टीने महत्वाचा असलेला, जिजाऊ माँसाहेब यांचा आवडता कोंढाणा किल्ला अर्थात सिंहगड पहिल्यांदा जिंकण्याचा मानस केला.

तान्हाजी मालुसरे गौरवगाथा

मोगलांकडे असलेल्या कोंढाणा किल्ल्याचा किल्लेदार होता उदयभान राठोड, हा उदयभान राठोड म्हणजे राजस्थानांतील जोधपूरच्या राठोड वंशातील अतिशय शूर असा योद्धा आणि औरंगजेबाचा निष्ठावंत सरदार होता. कोंढाण्यावर किल्लेदार उदयभान राठोड आपल्या १५०० रजपूत सैनिकाच्या शिबंदीसह आपले कर्तव्य बजावत होता.

कोंढाणा अर्थात सिंहगड जिंकण्याची कामगिरी फारच कठीण होती. ही कठीण कामगिरी करण्याचे काम तान्हाजी मालुसरे या मराठा सरदाराने स्वतःच्या अंगावर घेतली.

तान्हाजी मालुसरे यांनी शिवाजी महाराजांचा आणि जिजाऊ माँसाहेबांचा निरोप घेतला बरोबर धाकटा भाऊ सूर्याजी मालुसरे आणि ५०० शूर मावळे देखील होते आणि माघ वद्य नवमी म्हणजेच दिनांक ४ फेब्रवारी १६७० रोजी तान्हाजी मालुसरे व सूर्याजी, मावळे सैनिकांसह किल्ल्याखाली आले.

तान्हाजी

तान्हाजी मालुसरे यांना गडाची सर्व माहिती होती, कारण हा किल्ला पूर्वी स्वराज्यात होता. शिवाय माहीतगार माणसेही बरोबर होती. गडाचा आकार काहीसा कुऱ्हाडीसारखा. किल्ल्यास पुणे व कल्याण दरवाजा असे दोन दरवाजे होते.

किल्ल्यात शिरायला तिसरी वाट नव्हती. किल्ल्याचा सर्वांगाला खोलखोल उभे कडे, तटबंदी अगदी भरीव चिऱ्यांची. गडाखाली शत्रू आला तर त्याच्यावर मारा करावयास तोफा बंदुकांसाठीच्या जागा ठेविल्या होत्या.

पश्चिमेच्या बाजूला गडाला जो कडा होता तो ताठ व खोल. त्यास दोणागिरीचा कडा असे म्हणत. त्याखाली कार्वीचे रान दाट माजलेले असायचे. किल्ल्याच्या या बाजूला चौक्या पहारे नव्हते. ही गडाची बाजू भयंकर बळकट होती.

तान्हाजी मालुसरे व सूर्याजी रात्री पाचशे शूर मावळ्यांसह दोणागिरीच्या भयाण दरीत शिरले. दोराच्या माळा लावून तान्हाजी मालुसरे आणि तीनशे मावळे किल्ल्यात पोहोचले.

किल्लेदारास मराठ्यांच्या आगमनाची चाहूल लागताच किल्ल्यावरील शिबंदी लढाईस सरसरली. दोन्ही सैन्ये काळोखांत समोरासमोर एकमेकांशी लढू लागली. किल्लेदार सरदार उदयभान राठोड व तान्हाजी मालुसरे यांची लढाई जुंपली.

तान्हाजी मालुसरे यांची ढाल तुटल्यावर त्यांनी हातावर शेला बांधला व उदयभान राठोडच्या तलवारीचे घाव झेलले, अटातटीच्या या झुंजीत तान्हाजी मालुसरे आणि उदयभान राठोड यांना एकमेकांचे प्राणांतिक वार लागून ते दोघेही मृत्यूमुखी पडले.

मावळा

आपले बंधू धारातीर्थी पडलेले पाहून खचून न जाता सूर्याजी मालुसरे यांनी आपल्या मावळ्यांना धीर दिला, मावळे उदयभान राठोडच्या सैन्यावर तुटुन पडले, हर -हर महादेवच्या घोषात ३०० मावळ्यांनी मोगल सैन्य गारद केले आणि कोंढाणा अर्थात सिंहगड जिंकून घेतला..

किल्ला जिंकलेला आणि तान्हाजी मालुसरे मृत्युमुखी पडले यांची खबर शिवछत्रपतींना पोहचली, आपल्या स्वराज्य स्थापनेच्या सुरुवातीपासून सोबती असलेल्या शिलेदारास रणात वीरमरण प्राप्त झालेले ऐकताच शिवाजी महाराज म्हणाले ” एक गड घेतला परंतु एक गड गेला “

शिवछत्रपतींनी अनेक जनसामान्य माणसांच्या अंगातील कर्तृत्व ओळखुन त्यांना योग्य संधी देत त्यांच्यामध्ये असामान्य असा स्वाभिमान, स्वातंत्र्याची उर्मी रुजवली त्यातीलच एका शिलेदार तान्हाजी मालुसरे यांची ही गौरवगाथा..


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *