सुरत ही जागतिक कीर्तीची बाजारपेठ होती येथील जकातीचे उत्पन्न औरंगजेबाची बहिण जहाँआरा बेगम हिला मिळत असे.सुरत बंदर मोगल साम्राज्याच आर्थिक वर्म होतं त्यांत शाहिस्तेखान ३ वर्ष महाराष्ट्रात पुण्यात तळ ठोकून बसला होता.त्यामुळे मराठा साम्राज्याला मिळणारा महसूल कमी होऊन राज्याची आर्थिक स्थिती नाजूक झाली होती.
महाराजांनी त्याची बोटे छाटून पुण्यातून हुसकावून लावल्यावर राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी तातडीने हालचाल केली नसती तर स्वराज्याची आर्थिक स्थिती ढासळली असती.
राजगडापासून ३२५ किमी उत्तरेस असलेल्या दक्षिण गुजरातमधील सुरत शहर सुरत त्यावेळी मोगलांचे आर्थिक केंद्र आणि प्रमुख व्यापारी बंदर होते. युरोप,आफ्रिका तसेच मध्यपूर्वेशी येथून मोठ्या प्रमाणात व्यापार होई. या व्यापारावरील करातून मोगलांना दरवर्षी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत असे. सुरतेचे शहर मोगलांच्या साम्राज्य सीमेपासून शेकडो किलोमीटर दूर असूनसुद्धा सुरतेला बलाढ्य तटबंदी करण्यात आलेली होती. या किल्ल्यावर व आसपास ५,००० सैनिकांची तरतूद होती.

सुरतेतील आर्थिक व भोवतीच्या सैनिकी हालचालींवर नजर ठेवण्यासाठी शिवाजी महाराजांनी आपला मुख्य हेर बहिर्जी नाईक याची नेमणूक केली.
सुरतेची बित्तंबातमी काढून बहिर्जीने शिवाजी महाराजांची भेट घेतली व सुरतेवर हल्ला केला असता मोठा खजिना हातात येईल असे सांगितले. यावर मसलत करून महाराजांनी सुरतेवर चाल करून जाण्याचा बेत रचला.
आपल्या राज्याच्या राजधानीपासून ३०० किलोमीटर अंतरावर असलेल्या मोगल साम्राज्याच्या आत घुसून त्यांचे प्रमुख शहर लुटण्याची ही धाडसी मोहीम विजयी करण्यासाठी अतिशय वेगवान व अचूक हालचाली करणे अत्यावश्यक होते. यासाठी मराठ्यांनी फक्त घोडदळ सज्ज केले.
डिसेंबर १५, इ.स. १६६३ रोजी ८,००० शिबंदी राजगडावरून सुरुवातीस ईशान्येकडे निघाली. मोगलांच्या ठाण्यांपासून दूर रहात खानदेशातून हे सैन्य तापी खोर्यात उतरले.
तुफान वेगाने वाटचाल करीत २० दिवसांत मराठे जानेवारी ५ रोजी १० वाजण्याचा सुमारास सुरतेजवळील गणदेवी गावाजवळ आले. तेथून त्यांनी मोगलांच्या सुरतेतील सुभेदार इनायतखान याच्याकडे वकील पाठवून “इनायतखान सुभेदाराने व सुरतेतील नामवंत व्यापार्यांनी महाराज सांगतील तेवढी खंडणी भरण्याची व्यवस्था करावी. अन्यथा सुरतची बदसुरत झाल्यास त्याची जबाबदारी आमच्यावर नाही.” असा संदेश पाठवला व त्याच्या उत्तराची वाट न पाहता सुरतेच्या हद्दीवरील उधना गाव गाठले.
सुरतेच्या बचावासाठी मोगलांनी ५,००० सैनिकांची तरतूद केलेली असली तरी त्याकाळची एकूण परिस्थिती पाहता सुरतेवर शत्रू चाल करून येणे असंभव वाटणे साहजिक होते.
खंभायतच्या आखातातील समुद्रीमार्गावर इंग्लिश, डच व पोर्तुगीज आरमारांचे वर्चस्व होते, उत्तरेला, आणि पूर्वेला शेकडो किमीपर्यंत मोगलांची सत्ता होती. दक्षिणेत शाइस्तेखान नुकताच मोठी फौज घेउन मराठे व इतर शाह्यांचे पारिपत्य करण्यासाठी येऊन गेलेला होता. असे असता तेथील सुभेदार इनायतखान याने सुरतेतील कुमक कमी केलेली होती. कागदोपत्री ५,००० सैनिक असलेल्या सुरतेत प्रत्यक्ष १,०००च्या आसपास लढते सैनिक होते.
बहिर्जी नाईक व त्याच्या हेरसंस्थेने याचाही माग लावलेला होता व शिबंदी परत वाढण्याआधीच हल्ला केल्यास सफल होईल असाही सल्ला शिवाजी महाराजांस दिला होता.
मराठे गणदेवीस आलेले कळता इनायतखान घाबरून गेला व त्याने सामोरे येऊन लढाई करण्याऐवजी सुरतेच्या किल्ल्यात पळ काढला. जानेवारी ५ च्या दुपारी त्याच्या काही तुकड्या मराठ्यांसमोर उभ्या राहिल्या. २० दिवस घोडदौड करीत आलेले असूनही मराठ्यांनी त्यांचा धुव्वा उडवला व उधन्यास रात्रीकरता तळ न ठोकता रातोरात सुरत गाठले.
किल्ल्यात लपून बसलेल्या इनायतखानाकडून अधिक काहीही प्रतिकार न होता मराठे शहरात घुसले व त्यांनी जागोजागी चौक्या बसविल्या. त्याचबरोबर त्यांनी सुरतेच्या बंदरावर हल्ला केला व तेथील धक्क्याला आग लावून टाकली. मोगल आरमाराने समुद्रातून येउन प्रतिकार करू नये यासाठीची ही चाल होती.
जरी बंदर नष्ट केले तरी मराठ्यांनी कोणत्याही युरोपीय वकिलाती, किल्ले किंवा आरमारांना धक्का लावला नाही. त्या वारुळात हात खुपसून लढाई जुंपली तर मराठ्यांचा मुख्य हेतू, जो भराभर सुरत लुटून नेण्याचा होता, तो बाजूलाच राहू नये म्हणूनची ही धूर्त चाल होती. मराठे असे अचानक येऊन धडकलेले पाहून युरोपीय सरदार दबकलेले होते व त्यांनीही मराठ्यांची कुरापत काढली नाही.
लूट-
शहराबाहेरून तसेच आतूनदेखील होणार्या हल्ल्यांविरुद्ध बंदोबस्त करतानाच मराठ्यांनी शहराची लूट सुरू केली. मोगल ठाणेदार व महसूलदप्तरांचे खजिने पुरते रिकामे केले गेले. दरम्यान पोर्तुगीजांकडे स्वतःचा बचाव किंवा हल्ला करण्यासाठी पुरेसी शिबंदी नाही हे लक्षात येताच त्यांनी पोर्तुगीजांकडूनही खजिना मिळवला. त्याचबरोबर तीन दिवस सतत मराठा सैनिकांनी शहरातील सावकारांच्या वाड्यांतून अमाप संपत्ती गोळा केली.
“सावकारांचे वाडे काबीज करून सोने, चांदी, मोती, पोवळे, माणिक, हिरे, पाचू, गोमेदराज अशी नवरत्ने; नाणी, मोहरा, पुतळ्या, इभ्राम्या, सतराम्या, असफ्या, होन, नाणे नाना जातींचे, इतका जिनसांच्या धोंकटीया भरल्या. कापड भांडे तांब्याचे वरकड अन्य जिन्नस यास हात लाविलाच नाही. असे शहर चार दिवस अहोरात्र लुटिले.”
या सावकारांत वीरजी वोरा, हाजी झहीद बेग, हाजी कासम सारख्या मातब्बर व्यापार्यांचा समावेश होता. मराठ्यांनी मोहनदास पारेख या ईस्ट इंडिया कंपनीच्या हस्तकाच्या वाड्यास हात लावला नाही. पारेख हा दानधर्मी व एतद्देशीयांना मदत करणारा असल्याने तो मृत असला तरी त्याची संपत्ती लुटली गेली नाही. इतरधर्मीय मिशनर्यांच्या मालमत्तेसही मराठ्यांनी अपाय केला नाही.
10 जानेवारी 1664 या दिवशी सकाळी महाराजांनी सुरत सोडली अन साऱ्या संपत्तीसह स्वराज्या कडे धाव घेतली.महाराज सुरतेहून सह्याद्रीचा घाट चढून ते नाशिक जिल्ह्यात पोहोचले तेथुन घाटमाथ्याने राजगडाकडे निघाले. महाराज लोणावळ्याच्या दिशेने येत असताना मोघली फौज आपल्या दिशेने येत असल्याची खबर मिळताच त्यांनी सारी सुरतेची लूट नेतोजी पालकर सोबत “लोहगड” किल्ल्यावर सुखरूप पाठविली.
आधिक वाचा-
–भारत पाकिस्तान सामन्यानंतर वाईट बातमी समोर.. संपूर्ण विश्वचषक स्पर्धेतून बाहेर झाला कर्णधार.