व्हॅलनटाईन डेच्या दिवशीच दिल्लीमध्ये आणखी एक खळबळजनक घटना घडली आहे. देशाच्या राजधानीमध्ये पुन्हा एकदा श्रद्धा वालकर प्रकरणाची पुनरावृत्ती झाली आहे. दिल्ली पोलिसांना ढाब्यावर एका तरुणीचा मृतदेह मिळाला आहे. या तरुणीचा मृतदेह एका फ्रीजमध्ये ठेवण्यात आला होता. दिल्ली पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. हा प्रकार दिल्लीच्या बाबा हरिदास नगर भागात घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी साहिल नावाच्या आरोपीला अटक केली आहे.
दिल्लीच्या द्वारकाचे अतिरिक्त पोलीस उपायुक्त विक्रम सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना मंगळवारी सकाळी एका महिलेची हत्या झाल्याचं आणि तिचा मृतदेह ढाब्यामध्ये लपवल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि आरोपी साहिल गहलोतला पकडलं. साहिल गहलोत मित्रांव गावाचा रहिवासी असून पोलिसांनी पुढची कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.
साहिलने 10 फेब्रुवारीला लग्न केलं होतं यावर महिलेने आक्षेप घेतला होता. हे दोघं बराच काळ रिलेशनशीपमध्ये होते, असं पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झालं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही महिला हरियाणाच्या झज्जर भागातली आहे. दुसऱ्या महिलेशी लग्न केल्यामुळे आरोपी असलेल्या साहिलला ही महिला कायदाच्या कचाट्यात अडकवण्याची धमकी देत होती, असं सांगण्यात येत आहे.
दिल्लीमध्ये झालेल्या श्रद्धा वालकर हत्याप्रकरणामुळे देशभरात खळबळ उडाली होती. 18 मे रोजी महरौली भागात आफताब पुनावाला नावाच्या व्यक्तीने त्याची प्रेयसी श्रद्धाची गळा दाबून हत्या केल्याचा आरोप आहे. हत्येनंतर आफताबने श्रद्धाचा मृतदेह फ्रीजमध्ये ठेवला. यानंतर आरोपीने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केले, तो रोज रात्री हे तुकडे जवळ असलेल्या महरौलीच्या जंगलात जाऊन टाकायचा. श्रद्धाची हत्या केल्यानंतर आरोपी त्याच फ्लॅटमध्ये राहायचा. 12 नोव्हेंबरला पोलिसांनी आफताबला अटक केली होती. आफताबने नार्को आणि पॉलीग्राफी टेस्टमध्ये श्रद्धाची हत्या केल्याचं कबूल केलं, यानंतर आफताबविरोधात दिल्ली पोलिसांनी चार्जशीटही दाखल केली